न्यूयॉर्क : अमेरिकेच्या काही राज्यांना चक्रीवादळाचा जबर तडाखा बसला आहे. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत 100 जणांना जीव गमवावा लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा केंटकी भागाला बसला आहे. येथे अनेक इमारती कोसळल्या आहेत. हजारो लोक बेघर झाले आहेत. ताशी 320 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अमेरिकेतील 6 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
एकट्या केंटकीमध्ये ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी बरेच जण मेणबत्ती कारखान्यात काम करत होते, तर इलिनॉयमधील ऍमेझॉन वेअरहाऊसमध्ये कमीतकमी सहा लोक मारले गेले. ते ख्रिसमससाठी रात्रीच्या शिफ्टमध्ये ऑर्डरची तयारी करत होते.
केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर म्हणाले, “राज्याच्या इतिहासातील ही सर्वात विनाशकारी तुफानी घटना आहे. आतापर्यंत ७० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जास्त लोक मारले गेल्याची भीती आहे. मी अशी विनाशकारी घटना माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नाही. मेफिल्ड शहरातील मेणबत्त्या कारखान्यात छत कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. तसेच त्यांनी मध्यरात्रीपूर्वी राज्यात आणीबाणी जाहीर केली होती,” असे बेशियर यांनी सांगितले.
केंटकीमधील मेणबत्ती कारखाना, इलिनॉयमधील अॅमेझॉन सुविधा आणि अर्कान्सासमधील एका नर्सिंग होमला वादळाचा फटका बसला. अधिकाऱ्यांनी आतापर्यंत २९ मृत्यूंची अधिकृत पुष्टी केली होती. त्यात तीन केंटकी काउंटीमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, चक्रीवादळ जोरात आले तेव्हा मेफिल्ड कारखान्यात सुमारे ११० लोक होते, असे गव्हर्नर बेशियर म्हणाले.
पश्चिम केंटकीमधील सुमारे १० हजार लोकसंख्येच्या मेफिल्ड शहरामध्ये नष्ट झालेल्या इमारती आणि कोसळलेल्या झाडांचा ढिगारा रस्त्यांवर पडला आहे. शनिवारी दिवसभर बचाव दलाकडून बचाव कार्य राबवण्यात आहे.