पाकिस्तान चीनची वसाहत? राजीनाम्यासाठी इम्रान खान यांच्यावर प्रचंड दबाव

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर 31 जानेवारीच्या आधी राजीनामा देण्यासाठी विरोधकांनी दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटची स्थापना केली आहे.

पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट मंगळवारी निवडणूक आयोगासमोर आंदोलन करणार आहे. याच दिवशी पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान नवाझ शरिफ यांची मुलगी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ गटाच्या उपाध्यक्ष मरियम नवाझ रावळपिंडीत एक मोठी सभा घेणार आहे. इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी होत असलेल्या या सभेच्या निमित्ताने विरोधक शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

माजी पंतप्रधान नवाझ शरिफ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे प्रयत्न इम्रान खान सरकार करत आहे. हे प्रयत्न सुरू असतानाच सरकारवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप होऊ लागले आहेत. इम्रान सरकारवरील आरोप अतिशय गंभीर आहेत. सरकारने बदल्याच्या भावनेतून शरिफ यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे, अशी भूमिका पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ गटाने घेतली आहे.

सरकारच्या कारभारामुळे पाकिस्तान हा देश चीनची वसाहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे नागरिक आणि विरोधक इम्रान खान सरकारवर प्रचंड नाराज आहेत. भ्रष्ट इम्रान आणि त्यांच्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.

इम्रान खान पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे पाकिस्तानचे केंद्र सरकार बरखास्त होईल. याच कारणामुळे विरोधक राजीनामा द्यावा असा दबाव टाकत आहेत. सरकारचे विरोधक असलेल्या राजकीय पक्षांनी, विचारवंतांनी, साहित्यिक, कलाकार, शेतकरी, वकील, डॉक्‍टर, नर्स, वैद्यकीय क्षेत्रातील इतर कर्मचारी, सर्व कामगार संघटनांनी आणि इतर नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

याआधी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांनी सरकार विरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची तयारी करत असल्याचे जाहीर केले. यामुळे एकाचवेळी अविश्वास प्रस्ताव आणि रस्त्यावर विरोधकांचे मोर्चा, सभा या स्वरुपातील शक्तीप्रदर्शन यातून सरकार विरोधात वातावरण निर्माण होत आहे. विरोधक नागरिकांच्या समर्थनाच्या जोरावर इम्रान खान सरकार पाडण्यासाठी सक्रीय झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.