“बोंडारवाडी प्रकल्पासाठी जागा निश्‍चिती करून प्रस्ताव शासनाला पाठवा”

सातारा (प्रतिनिधी) – जावळी तालुक्‍यातील 54 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्‍यक आहे. या प्रकल्पला पाणी आरक्षण मंजुरी मिळाल्याने जलसंपदा विभागाने बोंडारवाडी ग्रामस्थांच्या समस्येवर तोडगा काढून या प्रकल्पासाठी जागा निश्‍चिती करावी. तसा प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवावा, अशी सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

बोंडारवाडी प्रकल्पासाठी आ. शिवेंद्रराजे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पिकाऊ शेतजमीन वाचावी आणि धरणाचे काम व्हावे, अशी मागणी करून बोंडारवाडी ग्रामस्थांनी प्रकल्पाला विरोध केला होता. त्यांच्या मागणीनुसार आ. शिवेंद्रराजे यांनी काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांसमवेत धरणाच्या जागेची पाहणी केली होती. प्रशासन व ग्रामस्थांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी त्यांनी कृष्णानगर येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयात बैठक घेतली.

अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता महादेव धुळे, सहाय्यक अभियंता जयवंत बर्गे, जीवन प्राधिकरण मंडळाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे, शाखा अभियंता श्रीमती गडकरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, ज्ञानदेव रांजणे, बोंडारवाडीचे सरपंच बाजीराव ओंबळे, संदीप ओंबळे, विजय ओंबळे उपस्थित होते. 54 गावांचा पाणीप्रश्न आणि बोंडारवाडी ग्रामस्थांची शेतजमीन या बाबींचा विचार करून सहमतीने, कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊन धरणाचे काम मार्गी लागले पाहिजे.

अंतिम सर्वेक्षण करून धरणासाठी जागा निश्‍चिती करा. प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवा, असे आ. शिवेंद्रराजे यांनी सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार तातडीने कार्यवाही करू, असे मिसाळ यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.