पुणे-नाशिक की खाचखळग्यांचा मार्ग?

राजगुरूनगर येथे महामार्गाची चाळण : खड्ड्यात पडून दुचाकीस्वार गंभीर

राजगुरूनगर – पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरूनगर परिसरात खड्डे पडले आहेत. पान मळ्याजवळ सोमवारी (दि. 4) सकाळी दुचाकी खड्ड्यात पडल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे पुणे-नाशिक की खाचखळग्यांचा महामार्ग आहे, असा संतप्त सवाल प्रवाशांसह स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

रवींद्र बैताडे-नाईक असे जखमी झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. ते पुण्याहून नाशिककडे बुलेटवरून निघाले होते. राजगुरूनगरच्या पुढे मारुती शोरूमच्या समोरील खोल खड्ड्याचा अंदाज त्यांना न आल्याने ते खाली पडले. सुदैवाने मागून पुढून वाहन नसल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, दुचाकीसह पडल्याने त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर राजगुरूनगर येथील हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

राजगुरूनगर ते खेड घाट परिसरात पुणे-नाशिक महामार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या जीवघेण्या खट्ट्यांमध्ये अनेक दुचाकीस्वार पडल्याने जखमी झाले आहेत .तर खड्डे चुकविताना चारचाकी वाहनांना कसरत करावी लागत आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड अवजड वाहतूक असल्याने व पाऊसही जास्त पडत असल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष झाले आहे. या महामार्गावर मतांचे राजकारण करणारे नेते मूग गिळून गप्पच आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी महामार्गाची अवस्था झाली आहे. शिवाय याच ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने जीवघेण्या खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.