मुंबई – आइस्क्रीमच्या पॅकच्या मूळ किमतीत दहा रुपये वाढ केल्याने येथील एका हॉटेलला तब्बल दोन लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
येथील शगुन नावाच्या एका रेस्टॉरंटने एका ग्राहकाकडून मूळ किमतीपेक्षा दहा रुपये जास्त अकारले होते. या ग्राहकाने जिल्हा ग्राहक फोरमकडे याबाबत तक्रार केली होती. फोरमने याची गंभीर दखल घेत या रेस्टॉरंटला ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन लाख रुपयांचा दंड केला असून भविष्यात असा प्रकार घडू नये, अशी समजही दिली आहे.
पोलीस खात्यातील एक अधिकारी असलेले भास्कर जाधव नावाच्या या व्यक्तीने शगुन हॉटेलमधून एका कंपनीचे आइस्क्रीम खरेदी केले. या पॅकच्या मूळ किमतीपेक्षा 10 रुपये जास्त अकारले गेले. या पॅकची मूळ किंमत 165 रुपये होती व या हॉटेलने 10 रुपये जास्त घेत जाधव यांच्याकडून 175 रुपये घेतले होते.
जाधव यांनी दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक फोरमकडे तक्रार नोंदवली होती. आइस्क्रीम स्टोअर करावे लागत असल्याने 10 रुपये जास्त घेतल्याचे त्यांना हॉटेलकडून सांगण्यात आले. त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत फोरमने हॉटेलला ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी 2 लाख रुपयांचा दंड केला.