पुणे – शहर परिसरात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढला आहे. शहरात गुरूवारी (दि.12) राज्यातील सर्वात नीचांकी म्हणजेच 9.8 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली असून, पहाटेपासूनच शहरातील हवेत गारठा वाढल्याचे जाणवत होते.
शहर परिसरात नोव्हेंबरची सुरुवात झाल्यापासूनच किमान तापमानात सातत्याने घट नोंदविण्यात आली आहे. गुरूवारी तपमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसपेक्षाही खाली उतरला असून, पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद हवामान विभागातर्फे घेण्यात आली. यापूर्वी 2016 साली नोव्हेंबरमध्ये 9.2 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद हवामान विभागाने घेतली होती.
त्यानंतर तब्बल चार वर्षांनी पुन्हा एकदा तापमानाचा पारा नऊ अंश सेल्सिअपर्यंत खाली आला असून, थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही (13.4) पुण्याचे तापमान अधिक थंड असल्याचे विभागाच्या नोंदीमधून समोर आले आहे. त्यामुळे पहाटेपासूनच शहरातील वातावरणात गारवा वाढला असून, अनेक भागांमध्ये दाट धुके पसरल्याचे चित्र पहायला मिळाले.
राज्यात रत्नागिरी येथे सर्वात जास्त म्हणजेच 35.3 अंश सेल्सिअस इतक्या अधिक तापमानाची नोंद झाली आहे. वातावरणातील गारठा आणि दिवाळी सुट्टयांचा आनंद लुटण्यासाठी अनेक उत्साही नागरिक पहाटे घराबाहेर पडत असून, सायकलिंग, मॉर्निंग वॉक, ट्रेकिंग अशा माध्यमातून थंड वातावरणाची मजा अनुभवत आहे. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस गारठा कायम राहणार असला, तरी तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
सावधानतेचा इशारा…
शहरातील गारठा वाढत आहे. त्याचबरोबर सणांच्या उत्साहात सुरक्षिततेच्या नियमांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत असल्याने आगामी काळात याचे दुषरिणाम उदभविण्याची भिती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्याबाबत काळजी घेण्याचे आणि सुरक्षिततेच्या नियमाम्चे पालन करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.