भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा “एमटीव्ही निषेध अलोन टूगेदर’मधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे. या शोमधून टीबीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या काल्पनिक मालिकेत सानिया मुख्य भूमिका साकारणार आहे.
यावर्षीच्या प्रारंभीला जानेवारीत “एमटीव्ही निषेध’चा प्रीमियर झाला होता. टीबीविषयी जनजागृती करणे आणि योग्य उपचाराबाबतचे महत्त्व विशद करणे हा यामागचा उद्देश आहे.
सानिया मिर्झा म्हणाली, टीबी आपल्या देशातील सर्वात जुनी आरोग्य समस्या आहे. टीबीची अर्ध्याहून अधिक प्रकरणे ही 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांची आहेत. या रोगाचा सामना करणे आणि त्याबद्दल असलेले समज तातडीने बदलण्याची गरज आहे.
“एमटीव्ही निषेध अलोन टुगेदर’च्या माध्यमातून आजचे तरुण आपल्या देशास हानी पोहोचविणाऱ्या मुद्द्यांविषयी अधिक जागरूक, संवेदनशील असल्याचे दाखविण्यात आले आहे. सातत्याने टीबीचा धोका वाढत असून साथीच्या आजारामुळे तो आणखीन बळावतो आहे.
अशा परिस्थितीत टीबीला आळा घालण्यासाठी केलेला संघर्ष पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाला आहे. यामुळे मला यात काम करण्याची प्रेरणा मिळाली. मला आशा आहे की यामुळे सकारात्मक बदल होईल.
दरम्यान, या शोमध्ये अक्षय नलावडे आणि अश्विन मुशरानही झळकणार आहे. या महिन्याअखेर 5-ऍपिसोडची ही मालिका एमटीव्ही इंडिया आणि एमटीव्ही निषेधच्या सोशल मीडिया हॅंडलवर रिलीज करण्यात येणार आहे.