- पोलीस ठाण्यात मनुष्यबळाची कमतरता
- दहा दिवसांपासून अधिकारी आयुक्तालयात बसून
पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अधिकारी आणि कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. मात्र गेल्या दहा दिवसांपासून 34 पोलीस अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सात पोलीस ठाण्यांमध्ये निरीक्षक नाहीत. तसेच वाहतूक विभागालाही चार पोलीस निरीक्षकांची आवश्यकता आहे. याशिवाय गुन्हे शाखेतीलही अनेक पदे रिक्त आहेत. याचा थेट परिणाम पोलिसांच्या कामकाजावर होत आहे. तसेच अनेक पोलीस ठाण्यांमध्ये सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांचीही कमतरता आहे. दरवर्षी दिवाळीच्या सणामध्ये कर्मचारी व अधिकारी सुट्टीवर जातात. त्यामुळे आणखीनच तुटवडा जाणवतो.
राज्य सरकारने महिनाभरापूर्वी सहायक आयुक्ताच्या बदल्या केल्या. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आठ पदे मंजूर असताना नऊ सहायक आयुक्त नियुक्त करण्यात आले. त्या सर्वांना पदांचे वाटप करण्यात आले. तसेच 15 दिवसांपूर्वी राज्यातील खातेनिहाय परीक्षेत पास झालेल्या कर्मचाऱ्यांना बढती देऊन उपनिरीक्षक केले. तसेच इतर उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. पिंपरी चिंचवड शहरातील तीन निरीक्षकांच्या बदल्या केल्या. त्यापैकी दोन निरीक्षकांना कर्तव्यातून मुक्त करण्यात आले आहे. तर निरीक्षक मॅटमध्ये गेल्याने त्यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. तसेच इतर ठिकाणाहून बदली होऊन आलेले 13 पोलीस निरीक्षक आणि चार सहायक निरीक्षक पिंपरी चिचंवड आयुक्तालयात हजर झाले आहेत.
खात्यातंर्गत परीक्षा पास झालेल्या काही पोलीस उपनिरीक्षकांची शहराबाहेर बदली करण्यात आली होती. मात्र त्यास विरोध झाल्याने दुसरा आदेश काढत त्या उपनिरीक्षकांना पुन्हा आहे त्याच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखविण्यात आले आहे. बदली होऊन आलेले आणि नव्याने उपनिरीक्षक झालेले जवळपास 17 जणांनी पोलीस आयुक्तालयात आपली हजेरी लावली. गेल्या दहा दिवसांपासून हे सर्व अधिकारी पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले आहेत. आपल्याला कुठे नियुक्ती मिळणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
हिंजवडी, वाकडला अधिक मागणी
हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांची बदली झाल्याने हे पद रिक्त आहे. यामुळे मलाईदार समजल्या जाणाऱ्या हिंजवडी पोलीस ठाण्याकरिता सर्वाधिक मागणी आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांचा कार्यकाल पूर्ण झालेला नसला तरी अनेकजण तेथील वरिष्ठ निरीक्षकांकरिता फिल्डींग लावत असल्याचे दिसून येत आहे.
…तरीही राजकीय वशिलेबाजी सुरूच
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे आपल्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप खपवून घेत नाहीत. तरीदेखील नवीन रूजू झालेले पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक मलाईदार समजल्या जाणाऱ्या पोलीस ठाण्यात वर्णी लागावी यासाठी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत राजकीय वशिलेबाजी लावत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी सहायक निरीक्षक, उपायुक्त यांच्या भेटीगाठी व फोनाफोनी सुरू आहेत.