Mumbai Coastal Road| मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राइव्ह या मार्गिकेचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. त्यानंतर १२ मार्चपासून मुंबईकरांसाठी कोस्टल रोड खुला होणार आहे. मुंबईकरांना १२ मार्चपासून हा मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात येणार आहे. आठवड्यातील पाच दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ही मार्गिका खुली असणार आहे.
१५ मिनिटांत करता येणार प्रवास
या मार्गिकेमुळे पाऊण तासाचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. परंतु शनिवारी आणि रविवारी हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: बंद असणार आहे. एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलं आहे. तसंच संपूर्ण रस्ता टोलमुक्त असणार आहे. याबाबतची माहिती यापूर्वीच देण्यात आली होती. या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. याशिवाय प्रदूषणात देखील घट होणार आहे.
कसा आहे कोस्टल रोड?
कोस्टल रोडचा दक्षिणेकडील भाग प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असणार आहे. कोस्टल रोडमध्ये वाहतुकीसाठी प्रत्येकी २ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र भूमिगत बोगदे करण्यात आले आहेत. या प्रकल्पात बोगद्यात ६ व इतर ठिकाणी ८ मार्गिका आहेत. तसेच अग्नीप्रतिबंधक उपाययोजना म्हणून अत्याधुनिक फायरबोर्ड लावण्यात आले आहेत. या बोगद्यामध्ये अत्याधुनिक सकार्डो वायूविजन सिस्टिम आहे. याचबरोबर आपत्कालीन उपाययोजना करण्याता आल्या आहेत.
‘या’ वाहनांना असणार प्रवेशबंदी
सर्व प्रकारची अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, अवजड मालाची वाहने आणि मालवाहतूक करणारी वाहने (बेस्ट आणि एसटी बसेस किंवा खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने वगळून) यांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यासोबतच सर्व प्रकारच्या दुचाकी, सायकल आणि अपंग व्यक्तींसाठीच्या मोटर सायकल आणि स्कूटर (साइड कारसह), तीन चाकी वाहने, टांगा, हातगाडी यांसारखी वाहने यांना प्रवेशबंदी असेल. यासोबतच पादचाऱ्यांनाही कोस्टल रोडवर प्रवेशबंदी असणार आहे.
हेही वाचा: