मालेगाव – महाराष्ट्रातील राजकारणात 17 फेब्रुवारीला अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. आणि धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. तेव्हा पासून उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात जोरदार घणाघात होताना दिसत आहे.
शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे देखील राज्यभर दौरा असून, यामध्ये ‘शिवगर्जना शिवसंकल्प सभा’ घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच (दि. 5 मार्च) उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड भागात पहिली जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले होते.
त्यानंतर आता दुसरी सभा मालेगावात होत आहे. ही सभा 26 मार्च रोजी मालेगावच्या महाराजा सयाजी महाराज गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर सांयकाळी पाच वाजता होणार आहे. तर शिवगर्जना मेळावाच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेला आता एकच दिवस उरला असून या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. तर सभेच्या तयारीवर बारकाईने लक्ष देण्यासाठी ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि खासदार संजय राऊत मालेगाव मध्ये गेले आहेत. 1 लाखापेक्षा जास्त लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली असून,
जोरदार बॅनर बाजी देखील केल्याचं दिसून येत आहे. तसेच, या सभेदरम्यान उद्धव ठाकरे राज्यातील राजकारण आणि शिंदे गटावर बोलणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या सभेत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेचा टीझर चर्चेत..
‘बरं झाले गद्दार गेले.. आणि हिरे सापडले.., अद्वय केवळ मालेगाव नाही तर पुरा उत्तर महाराष्ट्र तुम्हाला बघायचा आहे. म्हटलं होत मालेगावला सभा घेतो जे काय बोलायचं ते मोकळ्या मैदानात बोलायचं काय असेल ते मैदानात..’ असं या टिझर मध्ये पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंच्या या सभेचा टिझर चांगलाच व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.