नवी दिल्ली : देशात काल एक मोठी घडामोड घडली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. दरम्यान, त्यांच्यावरील या कारवाईचे पडसाद संपूर्ण देशात तर उमटले पण जागतिक स्तरावरून देखील याविषयी प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राहुल गांधीवरील कारवाईचे पडसाद चक्क अमेरिकेच्या संसदेत उमटल्याचे माहिती समोर येत आहे.
मूळ भारतीय असणाऱ्या अमेरिकन खासदार रो खन्ना यांनी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी त्यांनी बोलताना, “राहुल गांधींची संसदेतून हकालपट्टी हा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा आणि भारतीय मूल्यांचा विश्वासघात आहे. माझ्या आजोबांनी वर्षानुवर्षे तुरुंगात राहून यासाठी स्वतःचा त्याग केला नव्हता असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.
The expulsion of Rahul Gandhi from parliament is a deep betrayal of Gandhian philosophy and India’s deepest values. This is not what my grandfather sacrificed years in jail for. @narendramodi you have the power to reverse this decision for the the sake of Indian democracy. https://t.co/h85qlYMn1J
— Ro Khanna (@RoKhanna) March 24, 2023
सिलिकॉन व्हॅलीचे खासदार रो खन्ना यांनी एक ट्विट केले असून यात त्यांनी,”राहुल गांधींची संसदेतून हकालपट्टी हा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा आणि भारतीय मूल्यांचा विश्वासघात आहे. माझ्या आजोबांनी वर्षानुवर्षे तुरुंगात राहून यासाठी स्वतःचा त्याग केला नाही. असे म्हटले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
एका पाठोपाठ केलेल्या ट्विटमध्ये खन्ना यांनी मोदींना तुमच्याकडे तेवढी शक्ती आहे कि राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निर्णय तुम्ही बदलू शकता असे म्हटले आहे. रो खन्ना यांच्या या वक्तव्यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी त्यानं उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘पंतप्रधानांना कायदे झुगारून देण्याचे अतिरिक्त न्यायालयीन अधिकार नाहीत. तसेच न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले असून ते लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत समाविष्ट आहे. असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.