‘करोना’चे नियम विसरले
पुणे – पुणे शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. करोना सुरक्षेसंदर्भातील नियम पाळण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत असताना नागरिकांना याचे कुठलेही गांभीर्य नसल्याचे शहरातील गर्दी वरून स्पष्ट होत आहे. मुख्य बाजारपेठा, मार्केट यार्ड, मंडई, किराणा दुकान, बसस्थानक अशा ठिकाणी सोशल डिंस्टन्सिंग सारखे नियम पायदळी तुडवले जात आहेत. मास्क लावण्याचा विसरही नागरिकांना पडला आहे. यातून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
लॉकडाऊन नको असेल तर मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे आणि सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांसह महापौरांपर्यंत सर्वांनीच केले आहे. महानगरपालिका आणि आरोग्य विभागाकडून याबाबत सातत्याने जनजागृती केली जात विनामस्क नागरिकांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे, त्यानंतरही याचा परिणाम नागरिकांवर होत नसल्याचे ठिकठिकाणच्या गर्दीतून दिसून येत आहे.
दुकानांबाहेरील वर्तुळ गायब…
सोशल डिस्टन्सिंगकरिता आखण्यात आलेले वर्तुळ आता गायब झाल्याचे दिसत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी अशी वर्तुळे पुसली असल्याचे चित्र आहे. नागरिकांकडूनच याचे पालन केले जात नसल्याने अशी वर्तुळे काढून टाकल्याचे दुकानदार सांगतात. यामुळेच महापालिकेने आता सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या व्यक्तीवरही दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. यात दुकानदारांच्या “पावत्या’ही फाडल्या जात आहेत.
24 तासांत 2700चा आकडा ओलांडला
पुणे शहरातील करोना बधितांची संख्या वाढू लागली असून गेल्या 24 तासांत 2752 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी असून ती कमी होण्याकरिता नागरिकांनी सुरक्षितता नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.