पुणे – फुकट जेवण न दिल्याच्या रागातून दुकान मालकाला मारहाण करून हॉटेलची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली. हा प्रकार विमाननगर, साकोरेनगर मधील हॉटेल फास्ट फूडमध्ये घडला.
याप्रकरणी एका 24 वर्षीय हॉटेल मालकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार जॉन राजू स्वामी (वय 26, रा. सिद्धार्थ नगर, रामवाडी) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अन्य व साथीदारांवरही गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांचे विमाननगर येथील साकोरेनगर येथे फास्ट फूड नावाचे हॉटेल आहे. स्वामी हा 23 जानेवारीला हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला होता. फिर्यादीने त्यांच्याकडे जेवणाच्या पैशाची मागणी केली. यावर चिडून त्याने जेवण फुकट न दिल्याने त्याचा राग मनात धरून हॉटेल बंद पाडण्याची व साथीदारांना घेऊन येत हॉटेलची तोडफोड करण्याची धमकी दिली. स्वामी थोड्याच वेळात साथीदारांबरोबर हॉटेलमध्ये आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून हॉटेलच्या कुकला लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच हॉटेलच्या काउंटरवर बसलेल्या फिर्यादीच्या आईला देखील धक्का देऊन खाली पाडले.
त्यानंतर फिर्यादीला रोडने मारहाण करून हॉटेल मधील सामानाची तोडफोड करून गल्ल्यातील जमा झालेली रोख रक्कम चोरी करून नेली. या प्रकरणी स्वामीसह त्याच्या इतर दोन साथीदारांवर खंडणीची मागणी करणे, संगनमताने जबरी चोरी करणे, मारहाण करणे, धमकावणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वामीला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.