आंबेठाण -करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचाराचा एक भाग म्हणून रुग्णांना गरम पाणी पिणे आवश्यक आहे; परंतु महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना ही सुविधा देणे शक्य होत नव्हते. ही गरज ओळखून सेवाभावी संस्थांनी या कोविड सेंटरला मदतीचा हात देत 3 लाख 20 हजार रुपयांच्या वस्तू प्रदान करण्यात आल्या.
रोटरी क्लब निगडी, चाकण एअरपोर्ट, इनरव्हिल क्लब निगडी प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांना पाणी गरम करून पिण्यासाठी 285 नग इलक्ट्रिक केटल, पाणी शुद्धीकरण यंत्र आरो दोन नग, गरम गार पाण्यासाठी चार नग डिस्पेंसर प्रदान करण्यात आल्या.
यासाठी चाकण रोटरी क्लब एअरपोर्ट अध्यक्ष वर्षा कड व सचिव सुनील कड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. खेड उपविभागीय अधिकारी सुनील गाडे, गटविकास अधिकारी अजय जोशी तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे, उमेश झेंडे सभापती अंकुश राक्षे, तलाठी शाम वालेकर, कोविड सेंटरमधील सर्व डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफकडे या सर्व वस्तू सुपूर्द करण्यात आल्या.
याप्रसंगी रोटरीयन राणू सिंघानिया, राकेश सिंघानिया, संदीप मुनोत, वैशाली भोसले, संतोष भोसले, संदीप मेदनकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सुनील कड व वर्षा कड यांनी पार पाडले.