नाशिक – नाशिक जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच असून इगतपुरी येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज वणी सापुतारा मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एका चिमुकलीसह दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
नाशिकमध्ये दिवसेंदिवस रस्ते अपघात वाढत असून अपघाताचे प्रमाण प्रचंड आहे. दररोज एक ना एक अपघाताची घटना घडत आहे. नाशिकहून गुजरातला जोडणाऱ्या वणी सापुतारा मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. वणी सापुतारा रस्त्यावर एसटी बसने दोन दुचाकीला चिरडले आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या मार्गावर सुरगाणा-नाशिक बस धावत असताना खोरी फाट्याजवळ दोन दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील प्रवाशांना बसने चिरडले. या अपघातात आठ महिन्याच्या चिमुरड्यासह वडील व आई असे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास करण्यात येत आहे.