पुणे – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज(दि.१०) शहरातील मध्यवर्ती भागासह लष्कर, खडकी भागात वाहतूक बदल करण्यात आला आहे. तिथीप्रमाणे जयंती असल्याने शहरातील विविध संघटनांकडून मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर अनेक भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
मुख्य मिरवणूक भवानी माता मंदीर येथून सुरू होऊन भवानी पेठ मार्गे रामोशी गेट चौक, नेहरू रोडने हमजेखान चौक पासून पुढे सोन्या मारुती चौक, फडके हौद चौकातून जिजामाता चौक मार्गे लालमहल चौक येथे विसर्जन होणार आहे. परिणाम नेहरू रोड वरील वाहतूक बंद केल्यानंतर पॉवर हाऊस कडुन सेव्हन लव्हज कडे जाणा-यांनी क्वार्टर गेट चौकातून इच्छित्स्थळी जावे. तसेच, लक्ष्मी रोडवरील वाहतूक बंद केल्यानंतर टिळक चौकाकडे जाणा-यांनी नेहरू रोड पॉवर हाऊस चौक येथून जिजामाता चौक मार्गे पुढे जावे. तर, देवजी बाबा चौकाकडुन मिठगंज चौक मार्गे स्वारगेट कडे जाणा-यांनी देवजीबाबा चौक ते दारुवाला पुलापासून पॉवर हाऊस चौकातुन नेहरू रोडचा वापर करावा.
गणेश रोडवरील वाहतूक आवश्यकतेनुसार शिवाजीरोड मार्गे गाडगीळ पुतळा- बुधवार चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. मिरवणुक मोती चौक, फडके हौद चौक पास होईपर्यंत केळकर रोडने बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदीर मार्गे येणारी वाहतुक आवश्यकतेनुसार आप्पा बळवंत चौकातून वळवून बाजीराव रोड, शिवाजी रोड मार्गे इच्छितस्थळी जाता येईल. शिवाजीरोड वरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातुन टिळक रोडने इच्छितस्थळी जावे. तर, स. गो. बर्वे चौकातुन पुणे मनपा भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रोडने इच्छितस्थळी जातील. मिरवणूक पुढे जाईल तसतशी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.
खडकी बाजार येथील शिवाजी पुतळा येथुन सुरू झालेली मिरवणूक कॅन्टोमेंट हॉस्पीटल चौक, तालिम चौकापासून पुढे महाराष्ट्र बँक मार्गे शिवाजीपुतळा येथे विसर्जीत होणार आहे. यावेळी या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.