नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बुधवारी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे माणिक साहा यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्रिपुराच्या राजघराण्याचे माजी सदस्य प्रद्योत माणिक्य देबबर्मा यांची भेट घेतली. या भेटीत भाजप आणि तिप्रा मोथा यांच्यातील युतीबाबत चर्चा केली. पण त्यांच्या या भेटीदरम्यान पुन्हा एकदा त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक घडली.
कॅमेऱ्यात दिसत असलेल्या सुरक्षेच्या चुकीनुसार अमित शहा यांचा ताफा आगरतळा येथील सरकारी अतिथीगृहातून बाहेर पडला. तेव्हा पांढऱ्या रंगाची टाटा टिगोर त्यांच्या मागे आली. या वाहनाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु वाहनचालकाने त्यांना चकवा दिला आणि भरधाव वेगाने ताफ्याला मागे टाकले. अमित शहांच्या ताफ्याची शेवटची गाडी गेल्यावर ही गाडी ताफ्यात सामील झाली, तर इतर काही व्हीआयपी गाड्या त्यांच्या मागे जाणार होत्या. या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.