सातारा – रस्त्यावर उभा असलेल्या कारला बाजुला होण्यासाठी हॉर्न वाजवल्याचा राग मनात धरून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आदित्य प्रकाश निकम (रा.लिंब,ता.सातारा) यांनी सहा संशयितांच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दिली आहे. संदेश ज्ञानदेव सावंत, संकेत ज्ञानदेव सावंत,प्रतिक यादव, रोहीत वाघमळे, तुषार सावंत (सर्व रा. लिंब,ता.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, दि.7 रोजी फिर्यादी हे यात्रेच्या जेवणाचे निमंत्रण देण्यासाठी गावातून लिंब फाट्याकडे निघाले होते. त्यावेळी संशयित हे रस्त्याकडेला त्यांची चारचाकी गाडी उभी करुन थांबले होते.
फिर्यादीने चारचाकी बाजुला घेण्यासाठी त्याच्या दुचाकीचा हॉर्न वाजवल्याने चिडलेल्या संशयित आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत आदित्यला दुखापत झाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपींना सातारा तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पो.ना. राऊत करत आहेत.