“सिग्नल फ्री’चा बोजवारा

अतिक्रमणांमुळे अडथळा वाहतूक पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष

दापोडी  – सुमारे शंभर कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नाशिकफाटा येथील दुमजली जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलाची खासगी वाहतूकदारांच्या अतिक्रमणांमुळे रया गेली आहे. वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी उड्डाणपुलाखालील जागा बळकावली आहे. हा चौक सिग्नल विरहित करण्याचा दावाही फोल ठरला असून अतिक्रमणांची बजबजपुरी वाढत चालली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुणे-मुंबई महामार्गावर नाशिकफाटा येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नाशिक फाटा येथे जागतिक बॅंकेच्या कर्जातून दुमजली उड्डाणपूल उभारला. एकाच वेळी महामार्ग, रेल्वे ट्रॅक आणि नदी ओलांडून जाणारा हा वैशिष्ट्‌यपूर्ण पूल कौतुकाचा विषय ठरला. या पुलाचे भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले. एलईडी दिव्यांचा झगमगाट करत या पुलाला आकर्षक सजवण्यात आले. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी या पुलाचा नजारा पाहण्यासारखा असतो. मात्र, उड्डाणपूल वाहतुकीस खुला होवून महिना-दोन महिने होत नाहीत तोच उड्डाणपुलाखालील वाहतूकदारांच्या अतिक्रमणांची बजबजपुरी वाढू लागली आहे.

या पुलाखाली रिक्षा बेशिस्तपणे उभ्या असतात. कासारवाडी रेल्वे स्टेशन तसेच पुणे, मुंबई, नाशिक अशा चारही बाजूंनी येणारे प्रवासी आपल्या रिक्षात कोंबण्यासाठी रिक्षा चालकांची स्पर्धा सुरु असते. जोपर्यंत पाच ते सहा प्रवासी रिक्षात बसत नाहीत. तोपर्यंत रिक्षा चालक चौकातून हटत नाहीत. खासगी ट्रॅव्हल्सच्या रांगा याठिकाणी लागलेल्या असतात. सायंकाळी सहा नंतर या ट्रॅव्हल्सची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. खासगी ट्रॅव्हल्स बसेसवर कोणाचेही नियंत्रण नाही. वाहतूक न पाहता मनमानी पध्दतीने बस उभ्या केल्या जातात. वाहतूक पोलीस तेथे उपस्थित असूनही त्यांना हटकत नसल्याचे पहायला मिळते.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना एस. टी. महामंडळ व पीएमपीएमएलच्या बसेस एकाच ठिकाणी थांबतात. त्यातच सध्या मेट्रोचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. नाशिकफाटा चौकापासून पिंपरीच्या दिशेने पुढे काही अंतरावर वस्तू विक्रेत्यांनी सेल लावले आहेत. याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांची वाहने महामार्गालगतच उभी असतात. तेथून पुढेच कार डेकोरेटर्सची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये सजावटीसाठी येणाऱी वाहने महामार्गावरच उभी केली जातात. बीआरटी लेन मधून इतर वाहनांना मनाई आहे. मात्र, त्यातूनही खराळवाडीपर्यंत वाहने धावतात. वर्दळीच्या वेळी सेवा रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. सामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्यांमधून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.