जकार्ता(इंडोनेशिया) – ईशनिंदेचा आरोप असलेल्या महिलेने केलेले अपील इंडोनेशियातील सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावले. मशिदींच्या मोठ्या आवाजाविरोधात या महिलेने तक्रार केली होती. तिला ईशनिंदेविरोधी कायद्यांतर्गत 18 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मेलियाना असे या 44 वर्षीय चिनी बौद्ध महिलेचे नाव आहे. सुमात्रा बेटावरील मेदान येथे आपल्या घराशेजारच्या मशिदीतील मोठ्या आवाजांमुळे आपल्याला त्रास होत असून हा साऊंड सिस्टीमचा आवाज कमी करण्याची सूचना त्यांनी केली होती. मात्र त्यांना ईशनिंदेच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले. त्यांनी केलेले आव्हानही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. याबाबतचा निर्णय वेबसाईटवरही प्रसिद्ध केला गेला.
इंडोनेशिया हा जगातील मुस्लिम बहुल देशांपैकी एक आहे. तेथे हिंदू, ख्रिश्चन, आणि बौद्ध या धर्मियांशिवाय एकूण 6 प्रमुख धर्मियांचे वास्तव्य आहे. तेथे धार्मिक आचरणाचे स्वातंत्र्य आहे मात्र धार्मिक टीका शिक्षेस पात्र आहे. ही शिक्षा प्रामुख्याने इस्लामवर टीका करणाऱ्यांना होते.