पोलिसांच्या मुलाचीच गुंडागर्दी ! पिस्तुलाचा धाक दाखवत घरात घुसून केले मुलीचे अपहरण ;वाचा सविस्तर

जयपूर : जयपूरमधील किशनगंज हौसिंग बोर्डजवळ एका चित्रपटाला शोभेल अशी घटना घडली आहे. एका गुंडाने घरात घुसून तरुणीचे फिल्मीस्टाइलने अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुण हा राजस्थान पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या पोलिसाचा मुलगा आहे.

आरोपी तरुण तरुणीच्या घरी जीप घेऊन आला. त्यानंतर पिस्तूल दाखवत घरात घुसला आणि तरुणीला ओढत बाहेर आणू लागला. त्यावेळी पीडितेच्या आई-वडीलांनी विरोध केला असता या तरुणाने तिला जबर मारहाण केली. त्यानंतर पीडितेला जीपमध्ये घालून पसार झाला.

किशनगड येथे तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबलच्या मुलाला सदर तरुणीचे अपहरण करण्यापासून कुणी रोखू शकले नाही. त्याने घराच्या बाहेर येऊन हवेत गोळीबार केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणीच्या आई, वडिलांना रुग्णालयात दाखल केले.

याबाबत माहिती देताना शेजाऱ्यांनी सांगितले की, आरडाओरडा ऐकून आम्ही घटनास्थळावर धावत पळत आलो. मात्र गुंडाच्या हातात पिस्तूल पाहिल्याने आम्हाला भीती वाटली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आरोपीला अटक करून तरुणीची मुक्तता करण्यासाठी पोलिसांनी पथक स्थापन केले आहे.

दरम्यान पीडितेच्या आईने आरोप केला की, हेड कॉन्स्टेबलचा मुलगा सुनील याच्याविरोधात तक्रार घेऊन आम्ही अनेकदा पोलीस ठाण्यात गेलो. मात्र तिथे आमचे कुणी ऐकून घेतले नाही. आता अपहृत तरुणीच्या आईला आपल्या मुलीच्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. तिच्या आई-वडिलांनी मुलीची लवकरात लवकर सुटका करण्याची विनंती पोलिसांना केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.