लोणावळ्यात पोलिसांची कारवाई : राजरोसपणे अवैध धंदे सुरू
कार्ला – लोणावळ्यातील लायन्स आणि टायगर पॉइंट या पर्यटन स्थळांवर बेकायदा बिगर परवाना हुक्का विक्री करणाऱ्या तिघांकडून हुक्का व हुक्का साहित्य ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकारामुळे या ठिकाणी सातत्याने राजरोसपणे अवैध धंदे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रतीक बाळू चव्हाण (वय 24, रा. लोणावळा गावठाण), स्वप्नील चंद्रकांत कदम (वय 26, रा. खोंडगेवाडी), शिवाजी कोंडीबा मरगळे (वय 30, रा. नांदगाव, मुळशी) असे बेकायदा व विना परवाना हुक्का विक्री करणाऱ्यांची नावे आहेत.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणावळ्याजवळील लोणावळा जवळील पर्यटकांचे आकर्षण पर्यटन केंद्र असलेल्या टायगर आणि लायन्स पॉइंट येथे विना परवाना व बेकायदा हुक्क्याची विक्री करत असताना तसेच विक्रीसाठी हुक्का व हुक्क्याचे साहित्य जवळ काही स्थानिक विक्रेते बाळगत असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या पथकाला निदर्शनास आले.पोलीस उपविभागीय अधिकारी लोणावळा नवनीत कुमार कावत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, पोलीस कर्मचारी गणेश होळकर, मयूर आबनवे, विशाल जांभळे यांच्या पथकाने तिन्ही हुक्का विक्रेत्यांकडून हुक्का व हक्क्याचे साहित्य जप्त केले आहे. त्यांच्या विरोधात सिगारेट आणि तंबाखु उत्पादने (जाहिराती प्रति. आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन व अधिनियमा अन्वये लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.