नगर (प्रतिनिधी) – गत वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. थर्टीफर्स्टचे काउंटडाउनही सुरू झाले आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी फक्त दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.
31 डिसेंबर म्हटला की पार्टी, नृत्य असे प्रकार आलेत. जेवणासाठी हॉटेल, धाबे, बार, पर्यटनस्थळांकडे सर्वांचाच ओढा असतो. ही संधी हेरून नेहमीसारखेच हॉटेल व्यावसायिक देखील मोठ्या पार्टयांचे आयोजन करण्यास सज्ज झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री बारा वाजता नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झालेली आहे. 31 डिसेंबरला रात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी करत आणि ओल्डमॅनला जाळत तरूणाई अखंड जल्लोष करते. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, असे म्हणत अनिष्ट रूढी आणि कथांचे प्रतीक असलेल्या ओल्ड मॅन जाळून नव्या जोमाने नववर्षात पदार्पण करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत.
31 डिसेंबरच्या निमित्ताने तरुणाईकडून हुल्लडबाजी तसेच आणि इतर कुप्रकार वा दुर्दैवी घटना घडतात. यावर वचक ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज पाहिजे. जेणेकरून कोणत्याही प्रकारावर आळा घालता येईल. तरुणांनी देखील योग्य नियोजन करूनच पार्टीचे बेत आखणे गरजेचे आहे शहरी धांगडधिंग्यापासून दूरवर रम्य ठिकाणी जाऊन नववर्ष साजरा करण्याचा बेत काही तरूणाईकडून आखल्या जात आहेत तर काही तरुणांकडून एकमेकांना नवीन वर्षांच्या संकल्प बाबत विचारणा करण्यात येत आहे. शिवाय कुणी गुटखा, तंबाखू सोडण्याचा संकल्प करताना दिसून येत आहे.
संदेशाची देवाणघेवाण
नूतन वर्षाच्या स्वागताची व गत वर्षाला निरोप देण्याचे संदेश सोशल मीडियावर फिरू लागले आहेत. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम आदी सोशल साईटवरून शुभेच्छांची देवाणघेवाण केली जात आहे.