पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने पुण्यातील आरएसएएमआय मधील बिपिन रावत सभागृहात लष्करी भव्यतेसह एक औपचारिक सन्मान समारंभ आयोजित केला होता. या समारंभात, मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पण, साहस, शौर्य आणि उत्कृष्ट प्रदर्शनासाठी ३५ वैयक्तिक पदकांच्या मानकऱ्यांना आणि २९ युनिट्सना सन्मानित करण्यात आले.
लष्कराच्या जवानांनी आणि दक्षिण कमांडच्या युनिट्सनी हा सन्मान स्विकारला. लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि युनिट सन्मानपत्र प्राप्तकर्त्यांचे अभिनंदन केले.
या समारंभाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार प्राप्त सैनिक, अधिकारी तसेच माजी सैनिकांसाठी २८ फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप अँड सेंटर, गार्ड रेजिमेंटल सेंटर आणि पॅरा रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटरच्या बँड पथकाने मार्शल संगीत सादर केले. बँड सदस्यांद्वारे विशेष कलाविष्काराच्या रूपात भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध राग देखील सादर करण्यात आले. अरुंधती पटवर्धन यांनी नृत्याविष्कार सादर केला.
२९ फेब्रुवारीला झालेल्या समारंभार लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात एकूण १३ सेना पदके (शौर्य), आठ सेना पदके ( प्रतिष्ठित सेवा), दोन युद्ध सेवा पदके, १३ विशिष्ट सेवा पदके, २७ जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ युनिट सन्मान आणि दोन लष्करप्रमुख युनिट सन्मान प्रदान करण्यात आले.
लष्कराच्या प्रथेप्रमाणे, वैयक्तिक शौर्य आणि आपल्या कर्तव्याप्रती असामान्य निष्ठेचे प्रदर्शन करत स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तींना आणि युनिट्सना विविध पुरस्कार प्रदान करण्यासाठी वर्षातून एकदा सन्मान समारंभ आयोजित केला जातो.