पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न नोंदणी व मुद्रांक विभागाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार खडी मशिन चौक कोंढवा बु. अर्थात हवेली क्रमांक १२ या दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. नव्या जागेतील या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे नोंदणी महानिरिक्षक हिरालाल सोनवणे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
यावेळी नोंदणी उपमहानिरिक्षक उदयराज चव्हाण, पुणे विभागाचे नोंदणी उपमहानिरिक्षक दिपक सोनवणे, सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे आदी उपस्थित होते. हवेली क्र्मांक १२ हे कार्यालय याच इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर होते.
त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर हे कार्यालय याच इमारतीमध्ये तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहे. याठिकाणी पक्षकारांसाठी हवेशीर प्रतिक्षाकक्ष, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती हिंगाणे यांनी दिली.