पुणे – घर मालकास पत्नीच्या मदतीने हनी ट्रॅपमध्ये अडकवून 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या भाडेकरुस खंडणी व अंमलीपदार्थ विरोध पथकाने अटक केली आहे. आरोपीने पत्नीसोबत घरमालकाचे चोरीछुपे अश्लिल व्हिडिओ चित्रीकरण केले. हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तडजोडीअंती 5 लाखची खंडणी घेताना आरोपीस रंगेहाथ पकडण्यात आले.
सलमान अहमद अली (वय 26, रा. चंदननगर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी वडगावशेरी येथील एका व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. आरोपीच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून रोख 21 हजार, मेमरीकार्ड आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडगावशेरी परिसरात फिर्यादीची इमारत आहे. आरोपी हा त्यांच्याकडे भाड्याने राहत होता. आरोपीच्या पत्नीने फिर्यादीला मेसेज करुन ओळख वाढवली. पती घरी नसताना महिलेने फिर्यादीला घरी बोलविले. यानंतर त्याच्याबरोबर अश्लिल चाळे केले. याचा व्हिडिओ आरोपीने चित्रीत केला. यातून तुझी बदनामी होऊ शकतो, त्यामुळे 50 लाख रुपये देऊन प्रकरण मिटवितो, असे घरमालकास सांगितले. त्यामुळे घरमालकाने पोलीस आयुक्तालयात तक्रार केली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक निलेश महाडीक, पोलीस हवालदार रमेश गरुड, सुनिल चिखले, विजय गुरव, फिरोज बागवान व प्रदीप गाडे यांच्या पथकाने सापळा रचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गुन्ह्यामध्ये आरोपीच्या पत्नीचाही सहभाग आहे. आरोपी वाडिया महाविद्यालयाजवळ हॉटेल असल्याचे सांगत आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने पैशासाठी हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत त्याने सांगितले.