नागपूर – तंत्रज्ञानाची प्रगती आणि सोशय मीडियामुळे गुन्ह्यांची पद्धती बदलली आहे. तसेच गुन्हेगारही अपडेट झाले आहे. आता नवीन हनीट्रॅपची संकल्पना गुन्हेगारांनी शोधून काढली आहे. यामध्ये अनेक तरुण सहज फसतात. अशा वेळी प्रतिष्ठा आणि घरच्यांच्या भितीने तरुण पैसे देऊन मोकळे होतात. यातच गुन्हेगारांचं फावतं. मात्र नागपुरात एका वडिलांनी आपल्या मुलाची हनीट्रॅपमधून सुटका करून घेण्यात यश मिळवलं.
हनीट्रॅपमध्ये तरुणी सोशल मीडियावर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून पुरुषांशी मैत्री करतात. त्यानंतर पुरुष मित्राशी व्हिडीओ कॉलवर बोलायचं. कॉलवर बोलताना आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड करून खंडणी मागण्यात येते. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या देशात कार्यरत आहेत.
नागपूरच्या सक्करदरा भागातील अशाच एका टोळीचा पर्दाफाश करुन पोलिसांनी टोळीतील एकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे पीडित तरुणाच्या वडिलांच्या युक्तीमुळे त्याची सुटका झाली.
तन्वयी नावाच्या तरुणीने काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला इन्स्टाग्रामवर फॉलो रिक्वेस्ट पाठवली. हळूहळू दोघांच्या गप्पा वाढू लागल्या. व्हॉट्सॲपवर बोलणं सुरु झालं आणि मग अश्लील विषयांवर चर्चा सुरू झाली. त्यानंतर तन्वयीने त्याच्याकडे नग्न फोटोची मागणी केली. तरुणाने देखील आपले न्यूड फोटो तन्वीला पाठवले. त्यानंतर सुरू झालं ब्लॅकमेलींग.
1 मे रोजी पीडित तरुणाला अज्ञात फोन आला. आमच्याकडे तुझे नग्न फोटो आहेत. ते व्हायरल करायचे नसतील, तर पैसे दे अशी धमकी देऊन आधी दीड हजार, नंतर पाच हजार आणि अखेरीस सहा हजार रुपये त्याच्याकडून उकळण्यात आले.
दरम्यान पैसे मागण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेलं. अखेरीस पीडित तरुणाने आपल्या वडिलांना विश्वासात घेऊन सर्वकाही सांगितलं. त्यानंतर तरुणाने आरोपीला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी रौनक प्रभू वैद्य थेट पीडित तरुणाच्या घरी पोहोचला. त्याने तरुणाच्या काका आणि वडिलांना अश्लील फोटो दाखवले. आमच्या नात्यातील मुलीसोबत तुमचा मुलगा अश्लील चॅटींग करत असल्याचं सांगितले.
दरम्यान प्रकरण मिटवायंच असेल तर 50 हजार द्या अन्यथा तुमची बदनामी करतो, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर पीडित तरुणाच्या वडिलांनी पैसे देण्याच कबूल केलं आणि त्याला एका मंगल कार्यालयात बोलवल. त्याचवेळी पोलिसांना कळवलं. आरोपी पैसे घेण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडल.