नगर – श्रीरामपूर येथील मतिमंद करोना बाधित रुग्णाचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना आज सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात करोना बाधित रुग्णाचा पहिला बळी गेला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील तिसऱ्या करोना रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तो करोनामुक्त झाला असून आज सांयकाळी पाच वाजता त्याला घरी सोडण्यात आले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात मतिमंद रुग्णाला प्राथमिक सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसत असल्याने त्याला प्रथम नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पाठविलेला त्याचा करोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यानंतर त्या रुग्णाला पुन्हा त्रास झाल्यानंतर त्याला लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु जास्त त्रास होत असल्याने त्याला चार दिवसांपुर्वी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे दाखल झाल्यानंतर त्याचा करोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.दरम्यान, उपचार घेत असताना आज सकाळी मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने त्याच्या मृत्यूस दुजोरा दिला.
संबंधित रुग्ण हा 27 वर्षीय असून तो मतिमंद आहे. सर्दी, खोकला झाल्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे 4 एप्रिलला त्याने उपचार घेतले. परंतु निदान न झाल्याने त्याला लोणी येथे हलविण्यात आले. पण तेथेही उपचार होत नसल्याने अखेर पुणे येथील ससुन रुग्णालयात त्याची रवानगी करण्यात आली. तेथे तो करोना संक्रमित असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर श्रीरामपूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या गावात जावून रुग्णाच्या घरी जाऊन कुटुंबियांची तसेच या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची माहिती घेतली. त्यानंतर तब्बल सहा दिवसांनी या करोना बाधित रुग्णाचा पुण्यात मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत करोनाचा एकही बळी नसलेल्या नगर जिल्ह्यात पहिला बळी गेला आहे.
जिल्ह्यातील तिसऱ्या करोनाबाधित रुग्णाचा 14 दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी हा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला. यापुर्वी दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिसऱ्या रुग्णाच्या अजून एका अहवालाची प्रतीक्षा होती.
तो अहवाल निगेटिव्ह आल्यास त्या रुग्णाला घरी सोडण्यात येणार होते. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरुवारपर्यंत पाठविलेल्या 122 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने पाठविले होते. त्यापैकी 103 अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून त्यामध्ये या तिसऱ्या रुग्णाचा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला आज सांयकाळी 5 वाजता बुथ रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांनी टाळ्या वाजून या रुग्णाला निरोप दिली.