बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याला एक महिना पूर्ण झाला आहे. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. त्याच्या मृत्यूनंतर महिन्याभराने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने त्याच्या बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे आणि एक अत्यंत इमोशनल पोस्टही लिहीली होती.
दरम्यान, आता सुशांतच्या मृत्यूबद्दल सीबीआय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. चाहते आणि अभिनेते शेखर सुमन तर सतत या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. अश्यातच सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने देखील तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने गृहमंत्री अमित शहा यांना याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची विनंती केली होती. परंतु, रियाला या पोस्टनंतर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. या प्रकरणी आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निवेदन समोर आले आहे.
अनिल देशमुख म्हणाले, “यामध्ये सीबीआय चौकशीची गरज नाही… मुंबई पोलिस तपास करत आहेत आणि मुंबई पोलिस अशी प्रकरणे हाताळण्यासाठी पुरेसे आहेत, मीसुद्धा सुशांतशी संबंधित ट्वीट आणि कॅम्पन्स पाहिले आहेत. परंतु मला असे वाटते की हे प्रकरण हाताळण्यासाठी सीबीआयची आवश्यकता नाही. मुंबई पोलिस अशी प्रकरणे हाताळण्यास सक्षम आहेत. ते या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक बाबींचा शोध घेत आहेत आणि आतापर्यंत आम्हाला त्यात कोणतीही कमतरता दिसत नाही. लवकरच तपासाचा संपूर्ण अहवाल समोर येईल. असं ते म्हणाले.