भुवनेश्वर – विश्वकरंडक हॉकी स्पर्धा यंदा भारतात होणार असून त्यासाठी ओडीशातील भुवनेश्वर व रुरकेला ही दोन शहरे या स्पर्धेतील सर्व सामन्यांचे आयोजन करणार आहेत. या स्पर्धेत यजमान भारतीय संघाने विजेतेपद मिळवले तर प्रत्येक खेळाडूला एक कोटी रुपये देण्याची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली आहे. येत्या शुक्रवारपासून (13 जानेवारी) सुरू होत असलेल्या या स्पर्धेसाठी केवळ ही दोन शहरेच नव्हे तर संपूर्ण राज्य सजले आहे.
पैलवान अभिजीत कटकेने पटकावला ‘हिंदकेसरी’ किताब, राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव
भुवनेश्वर व रुरकेला या दोन शहरांत होत असलेल्या या स्पर्धेत 16 संघांतून तब्बल जगभरातील 288 अव्वल हॉकीपटू आपली गुणवत्ता सिद्ध करतील. स्पर्धेचे यंदा 15 वे वर्ष असून भारतात ही स्पर्धा दुसऱ्यांदा आयोजित होत आहे. या स्पर्धेचे आयोजन दोन शहरांत प्रथमच होत असून स्पर्धेतील 44 सामने अनुक्रमे भुवनेश्वर व रुरकेला येथील कलिंगा व बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत.
1975 सालानंतर भारतीय संघाला ही स्पर्धा जिंकण्याची नामी संधी आहे. 2018 साली भारतातच झालेल्या स्पर्धेत बेल्जियमने विजेतेपद मिळवले होते. भारतीय संघ 13 जानेवारीला बलाढ्य स्पेनविरुद्धच्या सामन्याद्वारे आपली मोहिम सुरू करणार आहे. यानंतर 15 जानेवारीला इंग्लंड तर, 19 जानेवारीला वेल्सशी भारताचे सामने होणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 16 संघांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 4 संघ आहेत. गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ दुसऱ्या गटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघांविरुद्ध क्रॉसओव्हर सामने खेळणार आहेत. यातील विजेता संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल होणार असून क्रॉसओव्हर सामन्यांसह उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे सामने व अंतिम सामना कलिंगा स्टेडियमवर होणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत एकेकाळी बलाढ्य मानल्या जात असलेल्या पाकिस्तान संघाला पात्रताही मिळवता आलेली नाही. पाकिस्तान संघ या स्पर्धेच्या इतिहासात सर्वात यशस्वी मानला जातो. त्यांनी चार वेळा विजेतेपद तर दोन वेळा उपविजेतेपद मिळवले आहे.
उद्घाटन सोहळा होणार नेत्रदीपक
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नेत्रदीपक होणार आहे. प्रख्यात अभिनेता रणवीर सिंगसह देशविदेशातील कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तसेच प्रसिद्ध कोरियन बॅंड पॉप ब्लॅक स्वानचा सहभाग लक्षवेधी ठरेल. स्पर्धेसाठी क्रीडाग्रामही बांधून पूर्ण झाले असून तेथेच हायड्रोथेरपी व ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलावही सज्ज करण्यात आला आहे. स्पर्धेदरम्यान प्रदुषण होऊ नये यासाठी ओडिशा प्रदूषण नियंत्रण मंडळ रुरकेलातील काही कारखाने या कालावधीत बंद करण्यात येणार आहेत.
राज्याचे सुशोभीकरण
या स्पर्धेतील सामने ज्या दोन शहरांत होणार आहेत त्यांच्यासह संपूर्ण राज्याचा कायापालट करण्यात आला आहे. यासाठी विविध ठीकाणी राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी 51 शिल्प व मूर्ती बसवण्यात आल्या आहेत.