भारताच्या ज्युनिअर संघाचा चिलीवर विजय

सॅन्टियागो –परदेशातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या ज्युनिअर व वरिष्ठ महिला हॉकी संघ संमिश्र यश मिळवताना दिसत आहे. ज्युनिअर संघाने सोमवारी चिलीच्या वरिष्ठ संघाचा 2-1 असा पराभव केला. तर, वरिष्ठ संघाला अर्जेन्टिनाच्या ब संघाकडून 3-2 असा पराभव पत्करावा लागला. 

ज्युनिअर संघाकडून ब्युटी डुंगडुंग हिने अफलातून कामगिरी करताना 6 व्या व 26 व्या मिनिटाला गोल केले व संघाला पहिला हाफ संपण्यापूर्वीच वर्चस्व मिळवून दिले. त्यानंतरही भारतीय संघाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या होत्या. मात्र, त्यांना गोल करण्यात यश
आले नाही.

चिलीकडून फ्रान्सिस्का टिलाने 40 व्या मिनिटाला गोल करत त्यांच्या बरोबरी करण्याच्या आशा वाढवल्या होत्या. मात्र, त्यानंतर भारताच्या खेळाडूंनी अफलातून बचावाचे प्रात्यक्षिक दाखवले व त्यांचे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडले. चिलीच्या दौऱ्यावरील ही अखेरची लढत होती. या मालिकेत भारतीय संघ अपराजीत ठरला आहे.

वरिष्ठ संघाचे अपयश 

भारताचा वरिष्ठ महिला हॉकी संघही अर्जेन्टिनाच्या दौऱ्यावर असून या मालिकेत त्यांना संमिश्र यश मिळत आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाला अर्जेन्टिनाच्या ब संघाकडून 3-2 असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताकडून सलीमा तेतेने 6 व्या मिनिटाला गोल केला. अर्जेन्टिनाच्या सोल पगेलाने 25 व्या, कोस्टेन्झाने 38 व्या तर ऑगस्टिना ग्रोझलेनीने 39 व्या मिनिटाला गेल केले व संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताच्या गुरजीत कौरने 42 व्या मिनिटाला गोल करत ही आघाडी कमी केली मात्र, त्यानंतर भारताच्या खेळाडूंना एकही गोल करता आला नाही व सामना गमवावा लागला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.