मुंबई – हिटमॅन रोहित शर्माला सोमवारी सराव करत असताना हाताला चेंडू लागल्यामुळे दुखापत झाली आहे. भारताचा संघ या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार असून त्यापूर्वी रोहितला झालेल्या दुखापतीने संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.
या दौऱ्यावर जाण्यापूर्वी रोहितने कसून सराव सुरु केला होता. त्यात थ्रो डाऊन स्पेशालिस्ट राघवेंद्र यांचा चेंडू थेट रोहितच्या हाताला लागला. रोहितच्या दुखापतीबद्दल सविस्तर काहीही सांगण्यात आलेले नसले तरीही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध येत्या 26 डिसेंबरपासून सुरु होत असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी तो पूर्ण तंदुरुस्त होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अर्थात रोहितला आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी किमान दोन आठवड्यांचा कालावधी आहे. मात्र, या कालावधीतही तो तंदुरुस्त ठरला नाही तर पहिल्या कसोटीत त्याच्या जागी मयंक आग्रवाल आणि लोकेश राहुल डावाची सुरूवात करतील, असे सांगण्यात येत आहे.