“हिटलरने पण सत्तेत आल्यावर स्वतःच्या नावाचे स्टेडियम बनवले होते”;नाव न घेता राष्ट्रवादीची पंतप्रधानांवर टीका

मुंबई : जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम ठरलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्यानंतर विरोधकांकडून भाजपाला आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं जात असल्याचे दिसत आहे. ‘सरदार पटेल स्टेडियम’चे ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे नामकरण केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे. आव्हाड यांनी तर थेट जर्मनचा हुकूमशाह हिटलरचा दाखला देत, “हिटलर सत्तेत आल्यानंतर त्यानेही मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते” अशा शब्दात हल्लाबोल केला आहे.

“स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले…हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”, असे ट्विट करत आव्हाड यांनी मोदींचे नाव न घेता त्यांची हिटलरसोबत तुलना केली आहे.

दुसरीकडे, ‘सरदार पटेल यांच्या नावे असलेल्या स्टेडियमचं नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ करण्यात आलं. हा सरदार पटेलांचा अपमान नाही का? सरदार पटेल यांच्या नावानं मतं मागणारी भाजप आता पटेल यांचा अपमान करत आहे. गुजराजची जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही. सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध घातले होते म्हणून त्यांचा नाव हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केली आहे. तर, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही, ‘नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दल खात्री नसल्यानेच स्टेडियमला आपलं नाव दिलं, अशी खरमरीत टीका केली आहे.

दरम्यान, बुधवारी १ लाख ३२ हजार प्रेक्षकसंख्येची क्षमता असणाऱ्या भव्य मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.