सिंहगडरस्ता, बिबवेवाडी भागातही करोना बाधितांची संख्या जास्त
– अंजली खमितकर
पुणे – हडपसर, वारजे आणि कोथरूड भागात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. आधीच्या प्रादुर्भावावेळी जे हॉटस्पॉट होते, ते आता बऱ्यापैकी मागे पडले आहेत.
ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेले ताडिवाला रस्ता वगैरे भागामध्ये गेल्या वर्षी बाधितांची संख्या प्रचंड होती. मुळात बरेच दिवस या क्षेत्रीय कार्यालयाची हद्दच हॉटस्पॉट होती. मात्र, यावर्षी दुसरी लाट नाही परंतु प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यानंतर हडपसर, वारजे, कोथरूड या भागात बाधितांची संख्या वाढत आहे.
मुळातच कोथरूडमध्ये मागील वेळी संख्या कमी होती, परंतु आता जवळपास कोथरूड चौथ्या स्थानावर आहे. त्यानंतर सिंहगडरस्ता, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत असलेल्या भागातही बाधितांची संख्या वाढली आहे. 16 फेब्रुवारीनंतर बाधितांची संख्या वेगाने वाढली असून, ती साडेसहाशेच्या घरात गेली आहे. ज्या भागात हॉटस्पॉट आहेत तेथे मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अद्यापही त्याची म्हणावी तेवढी अंमलबजावणी होताना दिसत नाही.