मुंबई – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अखेर अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आर्थिक फेरफारप्रकरणी ईडीकडून करण्यात आली आहे. प्रवीण राऊत हे एचडीआयएलची सहयोगी कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन्सच्या संचालक मंडळावर आहेत. गोरेगावमधील एका प्लॉटच्या व्यवहारात एफएसआयचा घोळ केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात आर्थिक फेरफार करून पैसे लाटल्याच्या आरोपाची चौकशी सुरू आहे.
गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. मात्र प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी येथील एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. हा व्यवहार तब्बल 1000 कोटी रुपयांचा होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
याच काळात प्रवीण राऊत यांनी त्यांची पत्नी माधुरी यांना 1 कोटी 60 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. त्यातील 55 लाख रुपये माधुरी यांनी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना बिनव्याजी कर्ज म्हणून दिल्याचे स्पष्ट झाले होते. याच रकमेतून दादर पूर्वेत एक फ्लॅट खरेदी करण्यात आल्याचेही चौकशीतून पुढे आले होते.
दरम्यान, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असे या शपथपत्रात नमूद आहे. पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलच्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास ईओडब्ल्यू यांच्याकडून सुरू होता. त्यानंतर हे प्रकरण ईडीकडे सोपविण्यात आले आहे.