शेतकऱ्यांची लूट सहन केली जाणार नाही – सभापती ऍड. काळे
ओतूर (प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर अंतर्गत येणाऱ्या ओतूर उपबाजारातील कष्टकरी शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून मालाचे पैसे वर्षभरापेक्षाही जास्त काळ न देणाऱ्या दोन आडतदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे यांनी दिली.
सभापती काळे म्हणाले, संबंधित आडतदार हे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओतूर उपबाजार आवारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी विक्री करीत होते. काही दिवसांपासून खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक व मालाचे पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याबाबत बाजार समितीकडे तक्रारी येत होत्या. या तक्रारींची शहानिशा झाल्यावर संबंधित बाजार समिती यंत्रणांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे खात्रीशीर निष्पन्न झाल्याने नासिर इब्राहिम मणियार व मे. गणराज ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रा राजेंद्र नारायण डुंबरे या दोन आडतदारांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.