किव्ह – रशियाने युक्रेनमधील रहिवासी भागामध्ये क्षेपणास्त्रांचा मारा केला असून या हल्ल्यात किमान तिघेजण ठार आणि 25 जण जखमी झाले आहेत. युक्रेनच्या मध्यभागातील किरवियी रिह या शहरात रशियाने क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे, असे प्रांतीय सरकारने म्हटले आहे. या हल्ल्यामध्ये रशियाने क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला होता.
आज पहाटे या शहरातील पाच मजली इमारतीवर या क्षेपणास्त्राचा मारा झाला. या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे या परिसरामध्ये आग लागली, असे निप्रोपेट्रोवस्क प्रांताचे गव्हर्नर सर्हिय लयास्क यांनी म्हटले आहे.
इमारत पडल्यामुळे अनेक नागरिक या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे, असे त्यांनी टेलिग्रामवरच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
मातीच्या ढिगाऱ्याखाली किमान 7 जण गाडले गेले असल्याची शक्यता किरवियी रिह शहराच्या महापौरांनीही म्हटले आहे. मृतांचा आकडा 6 पर्यंत वाढल्याचे त्यांनी नंतर जाहीर केले.
दरम्यान, रशियाच्या सैन्याला हुसकावून लावण्यासाठी युक्रेनच्या सैन्याने जोरदार प्रतिआक्रमण सुरू केले आहे. रशियाच्या या क्षेपणास्त्र हल्ल्याला झेलेन्सकी यांनी दहशतवादी हल्ला म्हटले आहे.
काल रात्रभर युक्रेनच्या काही भागांमध्ये उखळी तोफांचा आणि काही भागांमध्ये ड्रोनचा हल्लाही करण्यात आला. युक्रेनने रशियाच्या ताब्यातील सातवे गाव ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.