शेवगाव – श्री संत एकनाथ महाराजांची श्री क्षेत्र पैठण येथून “ग्यानबा तुकाराम’, “विठुबा रुखुमाई’च्या जयघोषात श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पालखीने तालुक्यातील हातगाव येथे मुक्काम करून सोमवारी प्रस्थान केले. नाथाच्या पालखीचा आणि तालुक्यातील हातगाव ग्रामस्थांचा वेगळा ऋणानुबंध आहे. या पालखी रथाची बैलजोडी हातगावच्या मंत्री कुटुंबाची असते. गेली तीन पिढ्या ही परंपरा जोपासली जात असून, चालू वर्षी डॉ.नीलेश मंत्री यांनी संत एकनाथ महाराज पालखी रथासाठी बैलजोडी दिली आहे. त्यामुळे येथे उत्साहात पालखी सोहळा साजरा केला जातो.
येथील हत्तेश्वर मंदिरामध्ये पालखीच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. सोमवारी सकाळी पालखीची गावातून मिरवणुकीने पुढील मुक्कामासाठी प्रस्थान करण्यात आले. या वेळी गावातील भजनी मंडळ, लेझिम पथक व बॅंड पथकाच्या जल्लोषात पालखी सोहळा रवाना केला. हा सोहळा चनकवाडी (ता. पैठण) येथे पहिला मुक्काम करून दुसऱ्या मुक्कामी हातगाव येथे दाखल झाला होता.