पुण्यातील ऐतिहासिक ‘शिंदे छत्री’

पुणे : पुण्याच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारशामध्ये भर घालणाऱ्या ठिकाणांपैकी “शिंदे छत्री’ हे महत्त्वाचे ठिकाण आहे. वास्तूचे सुंदर आणि रेखीव स्थापत्य हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या कोणत्याही भागातून सहज पोहोचता येणारे हे ठिकाण सर्वांचे लक्ष वेधून घेते.

शहराच्या वानवडी भागामध्ये असणारे ‘महादजी शिंदे छत्री’ अर्थात “शिंद्यांची छत्री’ हे ठिकाण 18 व्या शतकातील मुत्सद्दी महादजी शिंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आलेले स्मारक आहे. याला “महादजी शिंदे यांचे समाधी स्थळ’ असे देखील म्हणले जाते. पानिपतच्या लढाईनंतर महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. 12 फेब्रुवारी, इ.स. 1794 रोजी त्यांचे निधन झाले.

 

ही मुख्य वास्तू 1715 मध्ये बांधण्यात आली. त्यानंतर 1900 च्या सुमार वास्तूचा विस्तार करण्यात आला. शिंदे छत्री स्मारकाच्या भोवती संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. या परिसरामध्ये घुमटाकार समाधी स्थळ, चौकोनी इमारत आहे. जागेच्या मध्यभागी शंकराचे मंदिर उभारले आहे. वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच मारुतीचे मंदिर आहे. त्याच परिसरामध्ये महादजींचा मुखवटा ठेवलेला आहे.

राजस्थानी स्थापत्यकलेचे उदाहरण असणाऱ्या वास्तूच्या पायऱ्या, कोरीव कमानी, खांबांची रचना आणि रेखीव नक्षीकाम असणारी वास्तू प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. वास्तूमध्ये असणारे काचेचे झुंबर आणि चित्रे कलांची साक्ष देतात. अँग्लो-राजस्थानी बांधकाम शैलींमुळे दोन वेगवेगळ्या संस्कृतीचे चित्रण या दुमजली वास्तूमध्ये पाहायला मिळते. या वास्तूच्या रंगीत खिडक्‍या इंग्रजी शैलीच्या आहेत. इमारतीचे स्थापत्य प्रशस्त असल्याने वास्तूला उत्तम वास्तूकला म्हणणे वावगे ठरणार नाही. वास्तूच्या स्थापत्य कलेसह वास्तूमध्ये असणारे महादजी शिंदे यांचे चित्रदेखील कलेचे वैविध्य उलगडण्यास मदत करते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.