“निवडणुकीत फटका बसण्याच्या धास्तीने मोदी सरकारने ‘तो’ निर्णय मागे घेतला”

नवी दिल्ली – सर्वसामान्य गुंतवणुकरांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अल्पबचत योजनांच्या व्याज दर कपातीचा निर्णय मोदी सरकारने निवडणुकीत फटका बसेल, या भीतीपोटीच मागे घेतला, असे वक्तव्य कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यावर व्याजदर पुन्हा घटवणार नाही, असे आश्वासनही द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी ट्‌विट करुन यासंदर्भात भाष्य केले. यामध्ये त्यांनी मोदी सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याज दर कपातीच्या निर्णयाबाबत घेतलेल्या यूटर्नवर टीका केली. निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शाह- निर्मला सरकारने गरीब आणि सर्वसामान्य माणसांसाठीच्या अल्पबचत व्याजदर कपातीचा निर्णय बदलला आहे, असे ते म्हणाले.

अल्प बचतीच्या सरकारी योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा आदेश हा अधिकाऱ्यांच्या नजरचुकीमुळे काढला गेला, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदर जैसे थे राहणार आहेत. नजरचुकीने काढले गेलेले हे आदेश मागे घेण्यात येत आहेत, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकारने बुधवारी रात्री अल्प बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सामान्य गुंतवणुकदारांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे काल रात्रीपासून या निर्णयाची प्रचंड चर्चा रंगली होती. अखेर रात्रभरात चक्रे फिरली आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सकाळी 7.54 मिनिटांनी ट्‌विट करून हा आदेश रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे सामान्य गुंतवणुकदारांचा जीव भांड्यात पडला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.