बेंगळूरू – कर्नाटकमधील ख्रिश्चन शाळांमध्ये बायबल शिकवण्याचे वर्ग बिगर ख्रिश्चन विद्यार्थ्यांनाही अनिवार्य केले जाण्याला हिंदू संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. क्लेरेन्स हायस्कूल या शतकभर जून्या शाळेमध्ये बायबल शिकण्याचा वर्ग बिगर ख्रिश्चन विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य करण्यात आल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. आपल्या पाल्याला शाळेत बायबल शिकवण्यास हरकत नाही, अशा आशयाच्या पत्रावर पालकांना स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते मोहन गौडा यांनी केला आहे.
शाळेच्या या पत्रावर स्वाक्षरी केलेल्या पालकांच्या मुलांनाच शाळेमध्ये प्रवेश दिला जात असल्याचा आरोप गौडा यांनी केला आहे.
हा प्रकार म्हणजे अन्य धर्मियांवर धर्माची शिकवण लादण्यासारखे आहे. हे वर्तन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देसांचे आणि राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्याच्या तरतूदीचा गैरफायदा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हे वर्तन बाल हक्क संरक्षण कायद्याचेही उल्लंघन असल्याचेही गौडा यांनी म्हटले आहे. शाळेच्या या धोरणाला अनेक पालकांनीही विरोध केल्याचा दावा त्यांनी केला आहे. शाळेच्या व्यवस्थापनाशी या संदर्भात चर्चा करण्यात आली असून गट शिक्षण अधिकाऱ्यांशीही या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. या संदर्भात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाकडून कोणतेही स्पष्टिकरण मिळू शकले नाही.