लाहोर – ईद उल फित्र निमित्त पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी देशातील तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या शिक्षेत दोन महिन्यांची सूट जाहीर केली आहे. लाहोरमधील कोट लखपत कारागृहाला भेट दिली असता शरीफ यांनी या सवलतीची घोषणा केली. मात्र ही सवलत दहशतवादाच्या प्रकरणांमध्ये दोषी असलेल्यांसाठी लागू होणार नाही. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि बंदी घातलेली दहशतवादी संघटना जामात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईद यालाही या सवलतीचा कोणताही फायदा होणार नाही.
पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने 8 एप्रिल रोजी हाफिज सईद याला दहशतवादासाठीच्या अर्थसहाय्याच्या आणखीन दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवून 32 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अशाच आणखीन पाच प्रकरणांमध्ये हाफिज सईद याला दोषी ठरवण्यात आले असून 36 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ही सर्व मिळून सईदला 68 वर्षांची शिक्षा झाली असून त्याला ही शिक्षा एकाचवेळी भोगायची आहे. त्यामुळेच सईदला इतकी वर्षे तुरुंगात काढावी लागणार नाहीत. सईदला 2019 मध्ये टेरर फायनान्सिंगच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले असून त्याच्यावर 1 कोटी डॉलरचे बक्षिसही जाहीर केले आहे.
सईदच्या बराकीलाही शरीफ यांनी दिली भेट
मनी लॉन्डरिंग आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी हाफिज सईदला कोट लखपत तुरुंगात गेल्या आठ महिन्यांपासून ज्या बराकीमध्ये ठेवले गेले आहे, त्या बराकीलाही शेहबाझ शरीफ यांनी भेट दिली. या तुरुंगात कैद्यांसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा कमी असल्याचे निरीक्षण शरीफ यांनी नोंदवले. या सुविधा निर्माण करण्यासाठी गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्या नेतृत्वाखीली एक समिती नियुक्त करण्याचा निर्णयही शरीफ यांनी जाहीर केला. याच कोट लखपत तुरुंगात शेहबाझ शरीफ यांचे थोरले बंधू आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही काही काळासाठी ठेवण्यात आले होते.