नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायद्याचा म्होरक्या अल जवाहिरीने नुकताच एक नऊ मिनीटांचा व्हिडीओ जाहीर केला आहे. या व्हिडीओमध्ये जवाहिरी हा भारतातील हिजाब प्रकरणावरून त्याने भारतातील लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. नऊ मिनीटांचा व्हिडीओ असून यात त्याने कर्नाटकातील उडुपी येथील सरकारी महाविद्यालयातील विद्यार्थीनी मुस्कान खान ही त्याची बहिण आहे, असे सांगत तिचं कौतुक केले. तसेच उल जवाहिरीने त्यासाठी एक कविता देखील सादर केली.
ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदा संघटनेची धुरा जवाहिरीने सांभाळायला सुरूवात केली. पण 2020 मध्ये त्याच्या मृत्यूची बातमी जगासमोर आली होती. पण काही महिन्यांनंतर त्याने एक व्हिडीओ जाहीर करून तो जिवंत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्याने हिजाब प्रकरणाबद्दल एक व्हिडीओ जाहीर केला. SITE इंटेलिजन्स ग्रुपनेही याला दुजोरा दिला आहे.
जवाहिरीनं व्हिडीओमध्ये मुस्कान खानचे कौतुक केले आहे. व्हिडीओमध्ये एक पोस्टर देखील त्याने जाहीर केले आहे. त्यामध्ये मुस्कानसाठी Noble woman of india असे लिहिलेले दिसत आहे. मुस्कानसाठी कविता सादर केल्यानंतर जवाहिरीने हिजाबवर बंदी घालणाऱ्या देशांचा निषेध केला. पाकिस्तान आणि बांगलादेशवरही जवाहिरीने निशाणा साधला.
कर्नाटकात हिजाबविरोधात निदर्शने करणाऱ्यांनी घेरल्यानंतर त्यांना प्रतिकार करणाऱ्या बीबी मुस्कान खान या विद्यार्थिनीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याच मुस्कानचे कौतूक आता एका दहशतवाद्याने केल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.