-कोझिकोड : येथे सुरु असलेल्या 25 व्या एएफआय नॅशनल फेडरेशन करंडक स्पर्धेत पंजाबच्या किरपाल सिंग बाथचा नवा विक्रम केला आहे. त्याने पुरुषांच्या डिस्कस थ्रोमध्ये 61.83 मीटर प्रयत्नांसह 22 वर्षांचा जुना विक्रम मोडून आपले वर्चस्व राखले. कारकिर्दीत प्रथमच 60 मीटरचा अडथळा पार केल्याचा आनंद किरपालने व्यक्त केला.
येथील सीएच महंमद कोया स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे त्याच्या आजच्या कामगिरीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने आपल्या चार प्रयत्नांत 60 मीटरहून अधिक लांब थाळी फेक केली. त्यापैकी दोन वेळा त्याने 61 मीटरचाही आडथळा पार केला होता. त्याची पहिली आणि शेवटची फेक 59 मीटर पेक्षा जास्त होती.
यापूर्वी पंजाबच्या 29 वर्षीय किरपाल सिंग बथ याने सहा वर्षांपूर्वी आपली ५९.७४ मीटर ही सर्वोत्तम कामगिरी नोंदविली होती. गेल्या वर्षी दोनदा, तो 60 मीटरच्या जवळ गेला होता, परंतु विकास गौडा निवृत्त झाल्यापासून प्रथमच एखाद्या खेळाडूने ६० मीटरचा आकडा पार केला.
दिल्लीच्या चंदाने सुरवातीपासून शेवटपर्यंत महिलांची ८०० मीटर शर्यत २:०२.११ मध्ये जिंकण्याचा प्रयत्न केला तर लिली दास (पश्चिम बंगाल) ने शेवटच्या १०० मीटरमध्ये वेग वाढवून पाचव्या स्थानावरून रौप्यपदक पटकावले. कृष्ण कुमार (हरियाणा) याने पुरुषांची शर्यत जिंकली परंतु आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पात्रतेपासून तो दूर राहिला.