वेलिंग्टन – हेन्री निकोल्सच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आपल्या पहिल्या डावात 6 बाद 294 धावांपर्यंत मजल मारली.
वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. त्यांचे 3 गडी 78 धावांत तंबूत परतले होते. त्यावेळी निकोल्सने विल यंगच्या साथीत चौथ्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली व संघाचा डाव सावरला.
यंग 43 धावांवर बाद झाल्यानंतर निकोल्सने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ब्रॅडली वॅटलिंगच्या साथीत 55 धावांची तर, डॅरेल मिचेलसह 83 धावांची भागीदारी केली व संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली.
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा निकोल्स 117 तर, केल जेमिसन 1 धावांवर नाबाद राहिले. निकोल्सने आपल्या खेळीत 207 चेंडूत 15 चौकार व 1 षटकार फटकावला. वेस्ट इंडिजकडून शॅनन गॅब्रीयलने 3 तर, चेमर होल्डरने 2 गडी बाद केले. अल्झारी जोसेफने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड पहिला डाव – 84 षटकांत 6 बाद 294 धावा. (टॉम लॅथम 27, ब्रॅडली वॅटलिंग 30, डॅरेल मिचेल 42, विल यंग 43, हेन्री निकोल्स नाबाद 117, केल जेमिसन नाबाद 1, शॅनन गॅब्रीयलने 3-57, चेमर होल्डर 2-65, अल्झारी जोसेफ 1-65).