शपथविधीला भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांची मांदियाळी
रांची – झारखंद मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. राज्यपाल दौपदी मुर्मू यांनी हेमंत सोरेन यांना झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. झारखंडच्या विधानसभेचे माजी सभापती आणि कॉंग्रेसचे नेते आलमगीर आलम, कॉंग्रेसचे झारखंद प्रदेशाध्यक्ष रमेश्वर ओरम आणि राजदचे आमदार सत्यानंद भोकिया यांनीही सोरेन यांच्यानंतर मंत्रीपदाची शपथ घेतली.
झारखंदमधील सोरेन याचा हा दुसरा शपथविधी होता. यापूर्वी 2009 ते 2013 दरम्यानच्या काळात ते झारखंडचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री होते. आलम आणि ओराम हे पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. तर भोकिया यापूर्वी 2000 ते 2005 दरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील “एनडीए’सरकारमध्ये कृषीमंत्री होते. त्यानंतर ते राजदमध्ये गेले होते.
शपथविधीच्या या भव्य समारंभाला कॉंग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सिताराम येचुरी, द्रमुकचे नेते एम.के.स्टॅलीन, त्यांच्या भगिनी कनिमोळी आणि राजदचे नेते तेजस्वी यादव आदी नेतेमंडळी उपस्थित होती. या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर स्थानिक राजकीय वर्तुळातील अनेकजण उपस्थित होते. भाजपच्या व्यापक आघाडीविरोधात उभी राहिलेली विरोधकांचे ऐक्य त्यातून स्पष्ट होत होते.
नुकत्याच झालेल्या झारखंडच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा-कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडीने 81 पैकी 47 जागा जिंकून भाजपचा पराभव केला होता. झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक)चे 3 आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी)च्या एका आमदारानेही सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.