शेफ सत्येंद्र जोग यांच्या कामगिरीची लिम्का बुक ऑफ वर्ल्डकडून नोंद
ठाणे – महाराष्ट्रात बटाटवडा हा सर्वसामान्यांचा सर्वाधिक आवडतीचा पदार्थ म्हणून ओळखला जातो. विशेषताः मुंबईकरांसाठी तर बटाटेवडे म्हणजे जीव की प्राण. अशातच डोंबिवलीत एक अनोखा विक्रम रचण्यात आला आहे. सलग बारा तासांत शेफ सत्येंद्र जोग यांनी तब्बल 25 हजार बटाटेवडे तळण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
डोंबिवली जिमखान्यात सुरू असलेल्या महोत्सवात सकाळी 10 ते रात्री 10:00 असे सलग बारा तास सत्येंद्र जोग यांनी बटाटेवडे तळले. यात दिड हजार किलो बटाटे, 500 लीटर तेल, 350 किलो बेसन आणि इतर साहित्य घेऊन त्यांनी बटाटेवडे तळण्यास सुरुवात केली. यासाठी 100 जणांच्या टिमने मेहनत घेतली. हा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी त्यांना 10 लाखांचा खर्च आला आहे.
डोंबिवलीतील अनेक लोकांनी यासाठी त्यांना आर्थिक मदतही केली आहे. एवढंच नव्हे तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डोंबिवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसिद्ध शेफ सत्येंद्र जोग यांनी हा उपक्रम सुरु केला असून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून या उपक्रमाची नोंद करण्यात आली आहे.
सत्येंग्र जोग गेल्या 15 वर्षांपासून उपहारगृह सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांमध्ये काम केले आहे. मुंबईची शान असलेल्या बटाटावड्याची ख्याती जगभरात पोहचावी यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. तसेच याबाबत बोलताना बटाटावडा हा मुंबईकरांचा आवडता खाद्यपदार्थ असून त्याला जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी हा विक्रम केल्याचे शेफ सत्येंद्र जोग यांनी सांगितले.