नवी दिल्ली – भाजप खासदार हेमामालिनी अयोध्येतील ‘प्राण प्रतिष्ठा’ समारंभाच्या आधी तेथे हिंदू महाकाव्य ‘रामायण’ वर आधारित नृत्य नाटिका सादर करणार आहेत. २२ जानेवारी रोजी ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा होणार आहे.त्याच्या आधीम्हणजे १७ जानेवारीला त्या आपल्या सहकलाकारांसह ही नृत्य नाटिका सादर करणार आहेत.
या संबंधात एका व्हिडिओ संदेशात हेमामालिनी यांनी म्हटले आहे की, “मी पहिल्यांदा अयोध्येत येत आहे. प्राणप्रतिष्ठ सोहोळ्याचा भाग म्हणून मी १७ जानेवारीला मी रामायणावर आधारीत नृत्य नाटिका तेथे सादर करणार आहे. अयोध्येतील राम लल्ला यांच्या प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यासाठी वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा आधी म्हणजे १६ जानेवारीला सुरू होतील.
वाराणसीचे पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित २२ जानेवारी रोजी राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे मुख्य विधी पार पाडतील. १४ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत अयोध्येत अमृत महोत्सव साजरा केला जाईल.त्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हेमामालिनी यांची रामायणारवर आधारीत नृत्य नाटिका हा त्याचाच एक भाग असणार आहे.