पिंपरी -करोनामुळे फुफ्फुसे निकामी झालेल्या तरुण केवळ एक तास कृत्रिम ऑक्सिजनशिवाय राहू शकत होता. त्याला शेल्टर हाऊसमध्ये स्थलांतरित करायचे होते. मात्र तेथील वीजपुरवठा एका तासापेक्षा अधिक काळ खंडित झाल्यास त्याच्या जीवावर बेतू शकत आहे. त्यामुळे शेल्टर हाऊसमध्ये इन्व्हर्टरची आवश्यकता होती. याबाबतचे वृत्त दै. प्रभातमध्ये प्रसिद्ध करताच दानशूर व्यक्ती पुढे आल्या आणि त्यांनी इर्न्व्हटरसाठी मदतीचा हात पुढे केला. आता लवकरच त्या तरुणाला शेल्टर हाऊसमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे.
मूळचा नेपाळचा नागरिक असलेल्या 34 वर्षीय भूपाल थापा याला जुलै महिन्यात करोनाची लागण झाली. त्यातच त्याची फुफ्फुसे निकामी झाली. एका तासापेक्षा अधिक काळ भूपाल हा कृत्रिम ऑक्सिजनशिवाय राहू शकत नव्हता.
तसेच पत्नी आणि बहिणीने त्याचा सांभाळ करण्यास नकार दिला. भूपालमुळे वायसीएम रुग्णालयातील एक बेड आडून होता. त्यामुळे त्यास पिंपरी पुलावर असलेल्या शेल्टर हाऊसमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय वायसीएमचे समाजसेवक आणि शेल्टर होऊस सांभाळणाऱ्या रिअल लाइफ रिअल पीपल या संस्थेने घेतला. मात्र एका तासापेक्षा अधिक काळ येथील वीजपुरवठा खंडित झाल्यास भूपाल यांच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे येथे इन्व्हर्टरची आवश्यकता होती.
केली आर्थिक मदत
“त्याच्या प्रत्येक श्वासासाठी मोजावी लागते किंमत’ या शीर्षकाखाली गुरुवारी (दि. 23) दै. प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर अभियंता तरुण अमोल वारूळे, वायसीएम रुग्णालयातील डॉ. किशोर खिलारे, वीज पर्यवेक्षक मुकुंद पाटील, याच रुग्णालयातील राजेंद्र शिर्के आणि सोमनाथ आलमखाने यांनी इर्न्व्हटर घेण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली.
आता लवकरच इर्न्व्हटर खरेदी करून भूपाल थापा यास पिंपरीतील शेल्टर हाऊसमध्ये स्थलांतरित केले जाणार असल्याचे वायसीएममधील समाजसेवक महादेव बोत्रे, कुंडलिक आमले, रिअल लाइफ रिअल पीपलचे अध्यक्ष एम. ए. हुसेन यांनी सांगितले.