सांगली : राज्यात मागच्या महिन्यात मुसळधार पाऊस आणि पुराने कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याच नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गावोगावी दौरे करत आहेत. त्यांनी आज सांगलीतील भिलवडीला भेट दिली. दरम्यान, या संकटातून मार्ग काढणारचं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री बोलत असताना, खाली एका नागरिकाने चांगलाच गोंधळ घातला. तो मुख्यमंत्र्याना मदतीची मागणी करत होता. साहेब मदत करा, चार वर्ष झाले पायात चप्पल घातली नाही, असं तो बोलत होता.
तो नागरिक मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यासाठी आला होता. यावेळी पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. “मुख्यमंत्री साहेब मी चार वर्ष अनवाणी फिरतोय, मला भेटू द्या, मुंबईत आल्यावर मला पोलीस अटक करतात”, असे म्हणत तो नागरिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करत होता.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भिलवडी येथे पोचल्यानंतर बाजारपेठ परिसरात पूरग्रस्तांशी संवाद साधताना पुढील मुद्दे मांडले; pic.twitter.com/11jRN5lgEQ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2021
मुख्यमंत्री म्हणाले, “ज्या क्षणी अतीवृष्टी होणार, संकट येणार हा एक अंदाज आला. तेव्हापासून प्रशासन कामाला लागले. जिथं-जिथं शक्य होईल तिथल्या धोकादायक वस्त्यांमधील नागरिकांचे आपण स्थलांतर करायला सुरवात केली. जवळपास ४ लाख नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. जीवितहानी होऊ नये, हा आपला प्रधान्यक्रम होता.”
“सांगलीतील पुरपरिस्थिती मला माहिती आहे. डोक्यावरुन पाणी जात होतं, अनेकांच्या घरात पाणी गेलं तसेच संसार उघड्यावर आले. आर्थिक नुकसान देखील झाले आहे. शेतीचं देखील नुकसान झालं आहे. या संकटांची मालिका आपल्यावर कोसळली आहे. मात्र मला आत्मविश्वास आहे की मी मार्ग काढणारचं. तात्काळ मदतीबाबत मी अंदाज घेत आहे. किती घरे उध्वस्त झाले, किती मदत करावी लागेल. तसेच काही ठीकाणी कायमस्वरुपी मदत करावी लागेल. त्यासाठी तुमची तयारी हवी,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर टीका केली, “ते म्हणाले आतापर्यंतची आपली प्रथा आहे. संकट आल्याबरोबर हजारो कोटीचे पॅकेज जाहीर करतात. मात्र, ते पॅकेज कुठं जातं कुणालाचं माहीत नाही. मला असे थोतांड येत नाहीत. मी प्रमाणिकपणे मदत करणार आणि ती केल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.